नांदगाव : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पंकज भुजबळ १८ हजार ४३६ च्या मताधिक्याने विजयी झाले. पंकज भुजबळ यांना निवडणूक निर्णय अधिकारी गाडीलकर यांनी निवडणूक निरिक्षक खंडेलवाल यांच्या व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम महाजन यांच्या उपस्थितीत निवडून आल्याचे पत्र दिले.एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २ लाख, १हजार १३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६२ मते अवैध ठरल्याने २ लाख, १ हजार ७२ मते वैध ठरली. २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. प्रत्येक फेरीत १४ मतदान केंद्रांची मतमोजणीचे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या सहा फेऱ्यांपर्यंत भाजपाचे (कमळ) उमेदवार अद्वय हिरे यांनी ९२६४ मतांची आघाडी नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचपंकज भुजबळ यांचेवर घेतली. हा भाग मालेगाव जिल्हापरिषद गटांचा होता. मात्र सातव्या फेरीनंतर अनुक्रमे नांदगाव जि.प. गट व शहर तसेच मनमाड, भालूर व जातेगाव गण सुरु झाले. यात हिरे यांनी घेतलेली मतांची आघाडी हळूहळू कमी होत गेली. शेवटच्या २३व्या फेरीत (पोस्टल मतदानासह) धनुष्यबाणाने कमळावर ४७६ मतांची आघाडी घेतल्याने कमळ तिसऱ्या क्रमांकावर गेले. यावेळेपर्यंत घड्याळाचा व नजीकचा प्रतिस्पर्धी कमळाऐवजी धनुष्यबाण झाले, व घड्याळास १८४३६चे मताधिक्य मिळाले. विजयानंतर पंकज भुजबळ म्हणाले की, दरवेळी परिवर्तन करण्याची परंपरा मतदारांनी आपण केलेल्या विकास कामांकडे बघून मोठ्या विश्वासाने खंडित केली, व मला विजयी केले. विकासाची नियोजित कामे पूर्ण करण्याची ही मतदारांनी दिलेली संधी आहे, असे मानून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. येथील नवीन तहसील कार्यालयात प्रथमच मतमोजणी झाली. १५ उमेदवार व त्यांचे प्रत्येकी १७ प्रतिनिधी यामुळे नियोजित छोट्या जागेत दाटीवाटी झाली. लघुशंकेस बाहेर जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने चोरट्या मार्गाने लोखंडी जाळी वर करून प्रतिनिधींना वॉशरूमचा प्रश्न सोडवावा लागला. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नव्हती. शेवटच्या फेरीचा निकाल जाहीर होत असतांना पंकज भुजबळ यांनी त्यांचे समर्थक बापूसाहेब कवडे, अरुण पाटील, भास्कर कदम, विजय चव्हाण, दिलीप इनामदार, विलास राजुळे, अरुण पाटील आदिंनी प्रवेश केला. (वार्ताहर)