दिलीप बच्छाव ल्ल गिसाकाबेरोजगारीवर मात करण्यासाठी येथील उत्तम पोपट देवरे या युवकाने भाड्याच्या जागेवर पंक्चरचे दुकान सुरू केले खरे; परंतु जागेच्या अडचणीमुळे परिस्थितीपुढे हताश न होता देवरे याने आपणच ग्राहकाच्या दारी का जाऊ नये असा विचार करत थेट ‘चालते फिरते मोबाइल पंक्चर दुकान’ दुकान सुरू केले आहे. देवरे यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे. शिवाय भररस्त्यावर कुठेही वाहन पंक्चर झाल्यास ‘जस्ट डायल’ नुसार केवळ एक कॉल केल्यावर वाहन जेथे पंक्चर झाले तेथे पंक्चरचे दुकान हजर होत असल्यामुळे त्यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उत्तम देवरे (३५) या इयत्ता पाचवीपर्यंत शिकलेल्या युवकाने साधारण पंधरा वर्षांपूर्वी रोजगाराचे साधन म्हणून सर्व प्रकारच्या वाहनांचे पंक्चर काढण्याचे दुकान सुरू केले. दाभाडीतील एका रस्त्यालगत भाड्याच्या जागेवर त्याने हे दुकान सुरू केले होते. तेथे जेमतेम व्यवसाय होत होता. त्यातच काही महिन्यांपासून त्याला सदरजागेची अडचण निर्माण झाली. दुसरीकडे दुकान सुरू करण्यायोग्य जागा मिळत नव्हती. जागा तर सोडावी लागणार होती. त्यामुळे आता दुसरीकडे रोजगार कसा मिळवावा या विवंचनेत देवरे होता. यासंबंधी विचारमंथन करत असतांनाच एक दिवस त्याच्या डोक्यात चालते फिरते पंक्चर दुकान सुरू करण्याचा विचार आला. त्यावर त्याने तातडीने कारवाई केली. लगोलग पीकअप गाडी घेवून त्यावर कॉम्प्रेसर ठेवून त्याने हे चालते फिरते मोबाइल पंक्चर दुकान सुरू केले. वाहनधारकांना आपल्याशी सहजतेने संपर्क करता यावा यासाठी त्याने आपला मोबाइल क्रमांक जवळपास सर्व वाहनधारकांना देण्याचा सपाटा लावला आहे. दाभाडीगाव परिसर ते पंचक्रोशीतील जवळपास दोन ते पाच किलोमीटरचा परिसर देवरे याने निश्चित केला आहे. या भागात सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या दुचाकी, ट्रक, ट्रॅक्टर व इतर सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांचे पंक्चर काढत तो अखंड सेवा देण्याचे काम करत आहे.
दाभाडीत चालते-फिरते पंक्चर दुकान
By admin | Published: October 29, 2014 10:26 PM