नाशिक : देशपातळीवर दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ राष्टÑीय दलित पॅँथरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. कोरेगाव भीमा दंगलीतील प्रमुख सुत्रधार संभाजी भिडे यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणीही मोर्चेक-यांनी केली.बी.डी. भालेकर मैदानावरून दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघाला. शालीमार चौक, शिवाजी रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोेर्चेक-यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच विविध घोेषणांचे फलकही दर्शविले. शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेवून निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून ती वेळेवर अदा करावी, आदिवासी व दलितांना वन जमिनी, गायरान जमिनी ताबडतोब वाटप करा, कर्मवीस दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेनसार शासकीय पडीत जमिनींचे भुमिहिनांना वाटप करावे, बेरोजगारांना नोक-या व बेरोजगार भत्ता देण्यात यावा, नाशिक शहरातील भाजीपाला विक्रेते, हॉकर्स व टपरीधारकांवर मनपा अधिका-यांकडून दडपशाहीचा अवलंब केला जात असून, तो थांबविण्यात यावा व पर्यायी जागा देण्यात यावे, मनपाने जाहीर केलेल्या हॉकर्स झोनचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात अध्यक्ष नाना भालेराव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.