लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर पोलीस मुख्यालयातील वसाहतींच्या मध्यभागी पोलीस परेड मैदान, मैदानाभोवती कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी २२ मजली ८ गगनचुंबी इमारती, या इमारतींवर हेलिपॅडची सुविधा, जलतरण तलाव, शूटिंग रेंज, स्पोर्ट््स क्लब आणि प्रशस्त सभागृह असे पोलीस वसाहतीचे सुंदर चित्र लवकरच बघावयास मिळण्याची शक्यता आहे़ पोलीस वसाहतीचा रूपडे पालटण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ गंगापूररोडवरील पोलीस मुख्यालयातील वसाहतीतील ब्रिटिशकालीन घरे अर्थात चाळींची कालौघात मोठी पडझड झाली आहे़ त्यातही जी काही घरे अस्तित्वात आहेत त्यांची अवस्था दयनीय आहेत़ गळकी कौले, छोटी घरे, डुकरे, मोकाट गायींचा संचार अशा परिस्थितीतही शहरातील घरांच्या अवास्तव किमतींमुळे वाढत चाललेली प्रतीक्षा यादी यामुळे वसाहतीतील या घरांनाच पोलीस कर्मचाऱ्यांची पसंती असते़ बारा तासाच्या ड्युटीनंतर थकून-भागून आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील विदारक स्थितीमुळे सुखाने आराम करणेही कठीण असल्याची ओरड अनेक दिवसांपासून आहे़ पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या निवासासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पुढाकार घेतला आहे़ आर्किटेक्टने तयार केलेल्या आराखड्यानुसार पोलीस वसाहतीतील जुन्या इमारती, तसेच परेड मैदानाजवळील इतर विभागांच्या इमारती तोडून त्याठिकाणी २२ मजली आठ इमारतींचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे पोलीस परेड मैदानाची जागा बदलली जाणार असून, ते मध्यभागी येणार आहे़ पोलिसांसाठी तयार करण्यात येणारी घरे ही ५०० ते ७०० प्रतिचौरस मीटर असणार आहे़ पोलीस अधिकारी ते कर्मचारी यांच्या पदानुसार घरांचे आकारमान कमी - जास्त असणार आहे़ न्यायालय तसेच शासकीय कामासाठी बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्थादेखील या ठिकाणी असणार आहे़
पोलीस हेडक्वार्टरचे पालटणार ‘रूपडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:20 AM