निळगव्हाण : अपघातात जखमी झालेल्या मयूर वाघचे कौतुकमालेगाव कॅम्प : तालुक्यातील निळगव्हाण येथील अपघातग्रस्त मयूर वाघने जिद्द व चिकाटीच्या जोरावर गंभीर दुखापतीनंतर दहावीचा पहिला मराठी विषयाचा पेपर थेट रुग्णालयात दाखल असताना दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील निळगव्हाणचा हा विद्यार्थी येथील के. बी. एच. शाळेत शिक्षण घेत आहे. दहावीच्या या परीक्षेसाठी मयूर वाघ गेल्या महिनाभरापासून अभ्यास करीत होता. १ मार्च रोजी मयूरचा नामपूर रस्त्यावर मोटारसायकल अपघात झाला. त्यास त्याला गंभीर मार लागून त्याचा उजवा पाय जायबंदी झाला. त्याला त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केले होते. उपचारादरम्यान उजव्या पायाची शस्त्रक्रिया करावी लागली व मांडीमध्ये लोखंडी सळई टाकण्यात आली. ३ मार्चला ही शस्त्रक्रिया झाली; परंतु त्यानंतर मयूरला पूर्ण हालचाली करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात ७ मार्चपासून दहावीच्या परीक्षेची चिंता त्याला सतावत होती. परीक्षा देण्याचा मनोदय त्याने वडील प्रकाश वाघ व आई सीमा वाघ यांना बोलून दाखविला; मात्र अशा अवस्थेत परीक्षेला जाणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरी मयूरची जिद्द बघून त्याच्या वडिलांनी त्याबाबत प्रयत्न सुरू केले. स्थानिक शाळा, नाशिक शिक्षण विभाग, पुणे बोर्ड यांना विनंती अर्ज केले पण त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही. परंतु मयूरच्या प्रबळ इच्छेमुळे कुकाणे, निळगव्हाण केबीएच स्कूलच्या काही शिक्षकांनी व शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला. याबाबत पुणे येथील बोर्डाचे उपसचिव माळवाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन काही अटी-शर्तींवर मयूरला शाळेमध्ये परीक्षेला येत नसल्याने त्यास थेट रुग्णालयातूनच पेपर लिहिण्यास परवानगी दिली. सोमवारी (दि. ६) सायंकाळी याबाबतचे आदेश शाळा प्रशासनाला प्राप्त झाले व मयूरला हॉस्पिटलमध्येच एक पर्यवेक्षक व पोलिसांच्या उपस्थितीत पेपर लिहिण्याला परवानगी मिळाली. आज पहिला मराठीचा पेपर मयूरने पूर्ण लिहिला. यापुढील सर्वच पेपर मयूर रुग्णालयातून देणार आहे. (प्रतिनिधी)
अपघातग्रस्त विद्यार्थ्याने रुग्णालयातून दिला पेपर
By admin | Published: March 07, 2017 11:40 PM