नाशिक : रिक्षामधून महिलांची पर्स चोरी होणे, पाकीट मारणे, लूट करणे या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत़; मात्र शहरात असेही काही रिक्षाचालक आहेत की, जे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात़ नाशिकरोडहून निमाणी येथे सोडलेल्या इसमाचे रिक्षात विसरलेले पैशांचे पाकीट व महत्त्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा करणारे पंचवटीतील पेठरोड येथील रिक्षाचालक राकेश पाटील यांचा पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ राकेश पाटील यांचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर आहे़ नाशिकरोड येथील शुभम राजेंद्र कपोते हे बुधवारी (दि़ २६) पाटील यांच्या रिक्षातून (एमएच १५, ईएच २१५५) निमाणीपर्यंत आले होते़ प्रवासभाडे घेतल्यानंतर पाटील यांना कपोते यांचे पाकीट रिक्षातच पडल्याचे लक्षात आले़ या पाकिटामध्ये चार हजार रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे होती़ त्यामुळे पाटील यांनी हे पाकीट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांच्याशी संपर्क साधला व पाकीट जमा केले़वाहतूक पोलिसांनी पाकिटातील कागदपत्रांवरून कपोते यांचा संपर्क क्रमांक मिळविला व त्यांच्याकडे पाकीट सुपूर्द केले़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत संबंधित रिक्षाचालकास बोलावून त्याच्या प्रामाणिकपणास सलाम करून त्यांचा सत्कार केला़ रिक्षाचालकांना राकेश पाटील यांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले़
प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:39 AM