नाशिक : मिसळ पार्टीच्या निमित्ताने मनसेत लक्ष्मीदर्शनावरील खदखद व्यक्त झाल्यानंतर ती कॅमेराबद्ध करून पेनड्राइव्ह राज ठाकरेंना देण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेले पक्षाचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष पराग शिंत्रे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मिसळ पार्टीप्रकरणी शिंत्रे यांना पक्षाने सर्वच पदांवरून पदमुक्त करण्यात आले होते. पक्षाचे सरचिटणीस ॲड. गणेश सातपुते व किशोर शिंदे यांनी पक्षाच्या वतीने काढलेल्या पत्रात शिंत्रे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून पदमुक्त करण्यात आल्याचे म्हटले होते. शिंत्रे यांनी राज ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी पक्षाच्या ध्येय-धोरणाविरोधात कोणतेही काम केलेले नाही. तसा विचारही मी करू शकत नाही. मी पक्षाविरोधात मीडियात बोललो नाही. काही लोकांनी ही बाब खोडसाळपणे मांडली. मात्र माझी भूमिका मांडण्यास मला संधी दिली गेली नसल्याचे दु:ख असल्याचे शिंत्रे यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.