नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली
असल्याने तिसरी लाट आली तरी तिचा फार मोठा परिणाम बालकांवर होणार नाही. तसेच पालकांनी बालकांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेतल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने रोखणे पालकांनादेखील शक्य असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाची लागण युवकांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दुसऱ्या लाटेपासूनच निदर्शनास येत आहे. त्यात तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्याचे आदेशदेखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असले तरी नागरिकांनीदेखील आपल्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालकांनी जर मनावर घेतले तर ते तिसरी लाट रोखू शकतात, असेच बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बालकांबाबत ही घ्यावी दक्षता
बालकांना सकस आणि प्रथिनयुक्त पौष्टिक अन्न द्यावे.
बाहेरून कोणताही रेडिमेड खाद्यपदार्थ मागवू नये.
बालके सोसायटीत भावंडासमवेत खेळत असली तरी मास्क लावावा.
मास्क घालताना त्यांना श्वास लागत नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
ताप, पोटदुखी, सर्दी, खोकला, घसा खवखवणे या लक्षणांची तातडीने दखल घ्यावी.
-----------
कोट
बालकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल, अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम ठेवावा. त्यांना दररोज घरातल्या घरात किंवा गच्चीत थोडा फार व्यायाम करण्यास प्रोत्साहित करावे. तसेच तिसऱ्या लाटेबाबत घाबरून न जाता पुरेशी दक्षता घेण्याबाबत पालकांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ, थंडपदार्थ, कोल्ड्रिंक टाळण्याबाबत पालकांनीच दक्षता बाळगणे हितकारक ठरणार आहे.
-डॉ. सुशील पारख, बालरोगतज्ज्ञ
कोट
सध्या बालके घराबाहेर जात नसली तरीही त्यांना वारंवार स्वच्छता, मास्क, या बाबींचे पालन करण्यास सांगावे. कोरोनाचा प्रभाव बालकांवर सध्या तरी फार प्रमाणात नाही. तसेच जगातही ब्राझिलवगळता अन्यत्र कुठेही फार मोठ्या प्रमाणात बालकांची जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे पालकांनी तिसऱ्या लाटेबाबत घाबरून जाण्याची आवश्यकता नसली तरी ताप, खोकल्यासह कोणतीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. मंदार वैद्य, बालरोगतज्ज्ञ
-----
अंगावर पिणारे बाळ असले तरी प्रत्येक आईने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लहान बाळांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण खूप कमी असेल. तसेच बहुतांश बालके गोळ्या, औषधांनी बरी होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. अन्य बालकांबाबत स्वच्छतेचे आणि आरोग्याबाबतचे सर्व नियम कटाक्षाने पाळले जायला हवे आहेत.
-डाॅ. संजय आहेर, बालरोगतज्ज्ञ
तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक पालकाचा आणि प्रत्येक भारतीयाला हातभार लावावा लागणार आहे. तिसरी लाट येईपर्यंत किमान ४० ते ५० टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. तसेच दक्षता म्हणून लॉकडाऊन उठल्यानंतरही पुढील ६ महिने मुलांना बाहेर पाठवू नये. बालकांनी किरकिर करणे, ताप, जुलाब, उलट्या, भूक लागणे, डोळे लाल होणे, डोके दुखणे, पोट दुखणे, डोळे लाल होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने टेस्ट करून उपचारांना प्रारंभ केल्यास तिसऱ्या लाटेबाबत फारसे घाबरण्याची गरज नाही.
-डॉ. शर्मिला कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ
·