सायखेडा : महाराष्ट्राच्या शहरासह ग्रामीण भागात खासगी मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा तीन महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत होत आहे. तर रिचार्जसाठी मोठी रक्कम घेऊनही सेवा नीट मिळत नसल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना ऑनलाइन शिक्षणामुळे पाल्यांच्या मोबाइलसाठी नेटचार्ज मारताना पालक मेटाकुटीस आले आहेत.
दूरसंचार क्षेत्रात क्रांती होत असताना प्रमुख दूरसंचार कंपन्यांच्या सिमकार्डद्वारे ग्राहक मोबाइल सेवा वापरत आहेत. मात्र तीनही कंपन्यांची इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या विविध व्यावसायांसह ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटची अत्यंत गरज आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिका इंटरनेटवरच होत असून इंटरनेटअभावी शिक्षणात प्रचंड व्यत्यय येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावर झाला आहे. याबाबत पालकांनी अनेकदा तक्रारी करूनही या दूरसंचार कंपन्या दाद देत नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. तऱ्हाडी , वरूळ, भटाणे, जवखेडा, तऱ्हाडकसबे, विक्रम, परिसरात मोठा गाजावाजा करून मोबाइल कंपन्यांकडून इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. अनेक योजनांचे गाजर दाखवत ग्रामीण भागातील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात आले. ग्राहकांना सुरुवातीला चांगली सुविधा मिळाली. इंटरनेटची गतीदेखील चांगली होती. परंतु गेल्या तीन-चार महिन्यांपासून सर्वच दूरसंचार सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा ऑनलाइन शिक्षणासाठी शेतीच्या मजुरीला जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी केलेला आहे, परंतु आता २० टक्के रिचार्जमध्ये वाढ झाल्याने प्रत्येकी प्लेन रिचार्जमागे शंभर रुपये जादा मोजावे लागत आहेत. सगळीच महागाई वाढल्याने आता मोबाइल वापरणे शक्य नाही.
- नरेंद्र डेर्ले, ग्राहक, शिंगवे
भारत सरकाच्या बीएसएनएल कंपनीने सर्व ग्राहकांना खासगी कंपनीपेक्षा चांगली सेवा दिल्यास आणखी ग्राहकांची संख्या वाढेल. परंतु बीएसएनएलकडून सेवा देताना ग्राहकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. सरकारने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांनी जी दरवाढ केली. त्याचा विचार करून बीएसएनएलने चांगल्या सुविधा दिल्यास आणखी प्रायव्हेट कंपनीमधून बीएसएनएलमध्ये पोर्ट आऊट करतील.
- महेश कुटे, अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, निफाड