नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असतानाही जातपडताळणीसाठी पालक व विद्यार्थी धावाधाव करीत आहेत.शहरातील काही पालक आणि विद्यार्थ्यांनी आमदार योगेश घोलप यांच्यासह जातपडताळणी समिती कार्यालयात धाव घेऊन उपायुक्तांची भेट घेत प्रमाणपत्र वेळेत देण्याची मागणी केली.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतानाच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्याचा ऐनवेळी निर्णय घेतल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता.संचालनालयाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती होती. तसेच प्रमाणपत्राची ही अट जाचक असल्याची ओरडही पालकांकडून केली जात होती. त्यामुळे शालेय आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता इतर अभ्यासक्रमांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जात असल्याचे स्पष्ट केले.परंतु अशातही पालकांकडून जातपडताळणीसाठी धावाधाव केली जात असल्याने समितीच्या कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागताना दिसत आहेत. दरम्यान, आमदार घोलप यांनी समितीच्या उपायुक्त वंदना कोचुरे यांची भेट घेऊन तातडीने प्रमाणपत्र दिले जावेत, कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये अशा संबंधितांना सूचनाकेल्या. उपायुक्त कोचुरे यांनीदेखील समितीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वेळेत प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.हजारो प्रकरणे निकालीजातपडताळणी समितीकडे नऊ हजार सातशे प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील मे अखेरपर्यंत सात हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. उर्वरित प्रकरणे अर्जदारांच्या त्रुटीमुळे प्रलंबित असून, समितीकडून संबंधितांना एसएमएसद्वारे सूचित केले जात आहे. अर्जदारांनी त्रुटी वेळेत पूर्ण केल्यास काही तासांतच त्यांना प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.