नाशिक : जसा भाव आहे, तशी भगवंताची मूर्ती बनते. ज्याप्रकारे माता-पित्याच्या जवळ जाण्यासाठी तयारी करण्याची गरज नसते, तसेच भगवंताच्या जवळ जाताना कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते. माता-पिता हेच आपले भगवान आहेत, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथेच्या दुसऱ्या पुष्पात ते शुक्रवारी (दि. १३) धनदाई लॉन्स येथे बोलत होते. श्रीरामकथेत विजय कौशल महाराज म्हणाले, प्रत्येकात काहीनाकाही दुर्गुण असतोच. माणसाच्या वाईट सवयी काहीही केले तरी सुटत नाही. माता, पिता, गुरु यांचे बंधन स्वीकारले पाहिजे. मर्यादांचे बंधन स्वीकारलेच पाहिजे. दान देण्याची वृत्ती असायला हवी. जशी क्षमता आहे, तशा प्रकारे दान केले पाहिजे. देवतांच्या आध्यात्मिक विकासाचे स्वरूप लक्षात घ्यावे. भगवंतासाठी काही सोडू नका. जागे राहिल्यास भगवान मिळतो. पद-पैसा मिळविण्यासाठी शरीराला कष्ट करावे लागतात, भगवंताला मिळविण्यासाठी शरीराला बसावे लागते. भगवंत मिळण्यासाठी व्याकूळता असावी लागते. भजनासाठी स्वार्थी बनावे. मात्र, व्यवहारात परमार्थ पाहिजे. एकदा भगवंतांचा आसरा मिळाला की दुसºया आसºयाची गरज नाही. माता, पिता आणि गुरू यांचा आशीर्वाद घेतल्यास दुसºया कुणाचाही आशीर्वाद मागण्याची गरज नाही. आचार, व्यवहार, समर्पण, वाणी यांनी माता, पिता, गुरू यांना प्रसन्न केले तर दुनियेतील कोणत्याही आशीर्वादाची गरज नाही.
माता-पिता हेच आपले भगवान - विजय कौशलजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:32 AM