कोरोनामुळे गेल्या वर्षी अनेक लोकांचे उद्योग-धंदे बंद झाले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अजून कालावधी असला तरी, शाळादेखील अलिकडेच सुरू झालेल्या असताना गोविंदनगर येथील न्यू ईरा शाळेने विद्यार्थ्यांकडे संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावत असल्याने शाळेने फी मध्ये ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी पालकांनी यापूर्वीच केली होती. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने १० फेब्रुवारीपर्यंत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे बुधवारी सर्व पालक शाळा व्यवस्थापनाला विचारणा करण्यासाठी जमले असता, शाळा व्यवस्थापनाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. खबरदारी म्हणून शाळेने मुंबई नाका पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पालकांची गर्दी शाळेजवळून कमी केली; मात्र पालकांनी शाळेलगत असलेल्या एका खुल्या मैदानात बैठक घेऊन शाळेकडून सुरू असलेली उडवाउडवीची उत्तरे बंद होण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. शाळेने यापूर्वीच १० फेब्रुवारीला याबाबतचा निर्णय देण्याचे आश्वासन दिले असल्याचे पालकांनी सांगितले; मात्र आता पुन्हा शाळा व्यवस्थापनाने अजून पाच दिवसांची मुदत मागितल्याने पालक संतप्त झाले होते. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांनी मागील वर्षीची फी भरलेली नाही. त्याचबरोबर शाळा शैक्षणिक फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फी आकारत नसल्याने शाळा आत्ताही फी कमी करण्याच्या मनस्थितीत नाही; मात्र पालकांचा आग्रह असल्याने याबाबत लवकरच काहीतरी तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. (फोटो १० शाळा)
शाळा शुल्कात सवलतीसाठी पालकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:16 AM