इंदिरानगर : द्वारका ते पाथर्डी फाटा या समांतर मार्गावर असलेल्या हॉटेल्सचे पार्किंग रस्त्यावरच केले जात असल्यामुळे वाहतुकीस खोळंबा होत आहे. विशेषत: गॅरेज मालकांनी या रस्त्यावरच ताबा मिळविल्याने रस्ता नेमका कुणासाठी, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मुंबई महामार्गावरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात आले. दोन्ही बाजूने समांतर रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यांचा ताबा व्यावसायिकांनी घेतला आहे. या मार्गावर सर्वाधिक संख्या हॉटेल्स व्यावसायिकांची आहे. हॉटेल्सच्या चालकांनी पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात किंबहुना हॉटेल्स संचालकाकडूनच रस्त्यावर वाहने उभी करण्यास सांगितले जाते. त्यामुळे समांतर रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. समांतर रस्त्यावर भाभानगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर,चेतनानगर, आदिंसह असंख्य उपनगरे आहेत. त्या परिसरात राहणारे विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी, महिलांसह नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचाच वापर करावा लागतो. मात्र या रस्त्यांवरील वाहनांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. द्वारका ते पाथर्डी या मार्गावर सुमारे १५ ते २० हॉटेल्स आहेत.सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत हॉटेल्समध्ये ग्राहकांची गर्दी असते. हॉटेलला वाहनतळ नसणे किंवा अपुरी जागा असल्यामुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास समांतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. या रांगांमधून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. (वार्ताहर)
समांतर रस्त्यावरील हॉटेल्सचे पार्किंग रस्त्यावर
By admin | Published: June 23, 2016 10:55 PM