बाजारपेठेमध्ये पुन्हा
भाज्यांची मोठी आवक
नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभी घसरलेले जिल्ह्यातील पालेभाज्यांचे दर काहीसे स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात परतावा मिळू लागला आहे. बाजारात आवक होणाऱ्या पालेभाज्यांचा आधीच्या तुलनेत उठाव होऊ लागल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकूणातच बाजारपेठेत पुन्हा भाज्यांची मोठी आवक होत असून ग्राहकांना फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या निवडीस अधिक वाव मिळत आहे.
शालीमार विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
नाशिक : महानगरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश रस्ते हे पदपथ विक्रेत्यांनी व्यापले असल्याने मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शालीमार आणि मेनरोड परिसरातील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. नागरिकांना बाजारपेठेतून दुचाकी वाहने नेण्यासही जागा उरत नव्हती. त्यामुळे या पदपथ विक्रेत्यांनी व्यापलेल्या रस्त्यांमुळे होत असलेली प्रचंड कोंडी काही काळ तरी हटली आहे.
चारचाकींचे दुतर्फा
पार्किंग ठरते अडथळा
नाशिक : महानगराच्या बहुतांश परिसरातील विविध ठिकाणी तसेच मोठमोठ्या दालनांसमोर मोठ्या प्रमाणात कारचे पार्किंग केले जात असल्याने त्या रस्त्यावरून अन्य वाहनांना जाणे जिकिरीचे ठरत आहे. ही सर्व वाहने रहदारीच्या रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरत आहे. प्रारंभी केवळ दुकानांजवळील रस्त्यावर असलेले पार्किंग आता थेट मुख्य रस्त्याचा भाग व्यापू लागल्याने वाहतुकीत अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत.
रस्ते दुभाजकांमधील
गवत पुन्हा वाढले
नाशिक : शहरातील रस्त्यांवरील दुभाजक तसेच वाहतूक बेटांवरील गवत पावसाळ्यानंतर कापण्यात आले हाेते; मात्र गत तीन महिन्यात पुन्हा बहुतांश दुभाजक आणि वाहतूक बेटांवरील गवत वाढल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना ते त्रासदायक ठरू लागले आहे, तसेच दुभाजकांमधील वाढलेले गवतदेखील रस्ता क्रॉस करताना वाहनचालकांच्या दृष्टीने अडथळा ठरू लागले आहे.