मनमाड : माळेगाव कऱ्यात (ता. नांदगाव) येथे विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला युवकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. तब्बल तीन तास जिवाच्या आकांताने विहिरीत ओरडत असलेल्या पाडसाला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले. येथून जवळच असलेल्या माळेगाव कऱ्यात, नारायणगाव घाटमाथ्यावरील जंगलामध्ये हरणांचे व वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. माळेगाव कऱ्यात येथील बाळू मिसर यांना त्यांच्या विहिरीत पाडस पडल्याचे निदर्शनास आले. मिसर यांनी तत्काळ आजूबाजूचे शेतकरी बांधवांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. भेदरलेल्या अवस्थेतील हरीण विहिरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विहीर खोल असल्याने त्याला बाहेर येणे शक्य नव्हते. वाल्मीक सोनवणे, भाऊसाहेब माळी, ग्रामपंचायत सदस्य रवि उगले, रहुल उगले यांनी अथक प्रयत्न करून दोरखंडाच्या साहाय्याने पाडसाला सुखरूप बाहेर काढले. बाहेर आलेल्या भेदरलेल्या हरणाने जंगलाकडे धूम ठोकली. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाण्याच्या शोधात पाडस माळेगाव परिसरात आले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पाडसाला मिळाले जीवदान
By admin | Published: March 22, 2017 12:08 AM