नाशिक : केंद्र सरकाने घेतलेल्या जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली चलनटंचाईची परिस्थिती सुधारत असताना रिझर्व्ह बँकेने एटीएममधून प्रति दिवस दहा हजार रुपयांपर्यंची रक्कम काढण्याची मूभा दिल्याने नागरिकांना निकडीच्या गरजा भागवताना अंशत: दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. चालू खात्यामधून ५० हजार रुपये काढण्याची मर्यादा १ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायात रोखीने व्यवहार करण्यासाठी व्यापारी वर्गाचा मदत होत असली तरी बचत खातेधारकांच्या अडचणी कायम आहे. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविणे दर्शनी बदल असून, हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. एटीएममधून रोज १० हजार रुपये काढता येत असले तरी बचत खात्यातून अशाप्रकारे एका सप्ताहात केवळ २४ हजार रुपयेच काढता येणार आहे. ही मर्यादा आरबीआयने कायम ठेवली आहे, म्हणजे दोन वेळा दहा हजार रुपये काढल्यानंतर अखेरचा पर्याय ४ हजार रुपये काढण्याचा शिल्लक राहणार आहे. त्यामुळे एटीएममधून अधिक रक्कम मिळेल असा समज झालेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान, एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची गरज भागविण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेला ११० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. मात्र निवडणुकांच्या काळात ही रक्कम अतिशय तोकडी असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
पैसे काढण्याची मर्यादा वाढल्याने अंशत: दिलासा
By admin | Published: January 18, 2017 12:02 AM