लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपावर जाण्याबाबतचे निवेदन व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीचा ग्रामसभेचा ठराव शेतकऱ्यांनी आमदार व तहसीलदारांकडे सुपूर्द केला. गेल्या काही वर्षांत पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून ठोस उत्पादन घेता आले नाही. उपलब्ध पाण्यावर उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणेही अवघड झाले आहे. कर्जाचा बोजा वाढत असून, वसुलीसाठी बॅँकांनी शेतकऱ्यांवर सक्ती सुरू केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविण्यास प्रारंभ केल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनांमुळे गाव पातळीवरील सामाजिक वातावरण बिघडले आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय शासनाने तातडीने घेतल्यास गावपातळीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची हमी आम्ही घेऊ, असेही निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून पुकारलेल्या संपात आम्ही सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी सरपंच वनीता कापडी, सुभाष बर्के, चिंधू डोमाडे, शरद कापडी, अशोक कर्डक, बाळू कापडी, बी. एन. कापडी, मधुकर कापडी, अशोक डोमाडे, बाळू कापसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन ७/१२ कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दूधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज ाुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे आदी मागण्यांचा ठराव देशवंडी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.
१ जूनपासून शेतकरी संपात सहभागी
By admin | Published: May 29, 2017 12:23 AM