नैतिक जबाबदारी घेऊन सरकारमध्ये सामील; अजित पवार म्हणाले, राज्यात आता डबल नाही ट्रिपल इंजिन सरकार
By Sandeep.bhalerao | Published: July 15, 2023 08:04 PM2023-07-15T20:04:58+5:302023-07-15T20:05:22+5:30
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नाशिकमधील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
नाशिक : काही नैतिक जबाबदारी घेऊन राज्यातील सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. अगोदर भाजप-शिवसेना यांचे सरकार होते, आता राष्ट्रवादी पक्ष देखील सहभागी झाला आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार होते, आता या सरकारला आपल्या पक्षाचे देखील इंजिन लागल्याने राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नाशिकमधील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उपसभापती नीलम गोऱ्हे, नरहरी झिरवाळ आदींसह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
राज्याच्या विकासाबरोबर आपण सरकारमध्ये सहभागी झाल्याने या महायुतीला मुख्यमंत्र्यांनी तर ‘त्रिशूल’ असे म्हटले आहे. येत्या काळात राज्याचा विकास, शेतकरी, उद्योगधंदे, रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना सध्या चांगला भाव मिळत आहे. दुग्धविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कमी हेाणार आहेत, यासाठीचे पाऊले उचलत आहोत. राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ज्या मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे ते मंत्री कोणताही भेदभाव आणि जातीपातीचे राजकारण न करता कामकाज करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राज्याच्या विकासासाठी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री कटिबद्ध आहोत. अर्थमंत्री म्हणून राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द आपण यावेळी देतो, असेही अजित पवार यांनी जाहीर केले. महाराष्ट्राचा विकास हाच सर्वांचे अजेंडा असल्याचेही अजित पवार म्हणाले.