पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ५ वाजेला संपल्यानंतर दिवसभर उमेदवारांच्या प्रचार फेरीत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी उमेदवारांनी रविवारचा दिवस साधून ओल्या पार्ट्यांची मेजवानी दिल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ झाली. या पार्टीत काही उत्साही कार्यकर्त्यांनी पेगवर पेग रिचवत सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. आपलाच उमेदवार निवडून येणार, अशा थाटात कार्यकर्त्यांनी मनसोक्तपणे ओल्या पार्टीचा झिंगाट आनंद लुटला. पंचवटी परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच चौकाचौकातील तसेच गल्लीतील रस्त्यावर विविध राजकीय पक्षांच्या प्रचारफेऱ्या तसेच पदयात्रा सुरू होत्या. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रचारफेरीत सहभागी झालेले काही उमेदवार मतदारांच्या गळाभेट घेत होते, तर काही रस्त्याने ये-जा करणाऱ्या ज्येष्ठांच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेत होते. दिवसभर प्रचार रॅली तसेच प्रचारसभा व चौकसभा आटोपल्यानंतर सायंकाळी ५ वाजेला प्रचाराची सांगता झाल्यानंतर विविध पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते प्रचार कार्यालयात जमलेले होते. सायंकाळी सातनंतर काहींनी थेट प्रचार कार्यालयात, तर काहींनी परिसरातील लॉन्स, मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांसाठी भोजनावळीची व्यवस्था केली होती. पंचवटी परिसरातील महामार्गावर असलेले काही ढाबे तसेच हॉटेल्स कार्यकर्त्यांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रचाराची सांगता झाल्याने कार्यकर्ते नाराज नको म्हणून अनेक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी ओल्या पार्ट्यांचे आयोजन केले होते. (वार्ताहर)
प्रचाराची सांगता अन् रात्रीच रंगल्या पार्ट्या
By admin | Published: February 20, 2017 12:05 AM