नितीन बोरसे सटाणाबागलाण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वाढत्या उन्हाबरोबरच राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले असतांना वीरगाव गटात मिनी मंत्रालयात जाण्यासाठी आदिवासी महिलांमध्ये आदळआपट सुरू झाली असून, ऐन निवडणुकीत केलेले पक्षांतर आणि नाराजांनी बंडाचे निशाण फडकविल्याने येथे सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात या पंचरंगी सामन्यात चुरस निर्माण झाली आहे.वीरगाव गट हा तसा कॉँग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे; मात्र माजी मंत्री स्व. डॉ. दौलतराव अहेर यांच्या प्रभावामुळे या गटावर तब्बल एक दशक भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यांनतर माजी आमदार स्व.पंडितराव धर्माजी पाटील यांच्या स्नुषा व माजी सभापती यशवंत पाटील यांच्या सौभाग्यवती संगीता यांनी हा गट पुन्हा काबीज केला. एक दशकापासून हा गट आता कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. कॉँग्रेसने हा गट कायम राखण्यासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती सीताबाई बागुल यांना उमेदवारी देऊन जबाबदारी टाकली आहे. सीताबाई बागुल या पहिल्या महिला पंचायत समिती सभापती म्हणून निवडून आल्या होत्या. कालांतराने त्या नाशिकला स्थायिक झाल्यामुळे त्यांचे दर्शन देवदुर्लभ असून त्यांना कॉँग्रेसचा गड राखण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.भाजपने गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत चीत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार साधना गवळी यांना आयात करून उमेदवारी बहाल केली. यामुळे भाजपाच्या निष्ठावंत दुखावले गेल्याने त्यांनी सेनेची वाट धरली. नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मोट बांधून आदर्शगाव किकवारीच्या सरपंच मंजुळाबाई कैलास जहागीरदार (सोनवणे ) यांच्या हातात ऐनवेळी सेनेचे धनुष्यबाण दिले. भाजपामध्ये उमेदवारी लादल्याने नाराजी असताना राष्ट्रवादी मध्येही या पेक्षा वेगळे चित्र नाही. राष्ट्रवादी मध्ये तिकीट मिळविण्यापासूनच मारामारी सुरु होती. पंचायत समितीचे विद्यमान राष्ट्रवादीचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांच्यासाठी दावेदारी केली होती; मात्र पक्षातीलच काही मंडळीने त्यांना विरोध करून जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती व देवळ्याच्या रहिवासी उषा बच्छाव यांना उमेदवारीसाठी एकप्रकारे पायघड्या घातल्या. बच्छाव यांनाही सोयीचा गट नसल्यामुळे त्या राजी होऊन उमेदवारी माळ अलगद त्यांच्या गळ्यात पडली. यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी मोट बांधून आपली क्षमता सिद्ध करण्याचा विडा उचलला आहे. वीरगाव गटात वंदना घोडे यांना अपक्ष मैदानात उतरवून बंडाचे निशाण फडकावले आहे. उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या मिनी मंत्रालयाच्या लढाईत अपक्षांसह सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीच्या अंतिम चरणात चुरस निर्माण झाली आहे. एकंदरीत नाशिक स्थायिक सीताबाई बागुल यांना कॉँग्रेसने आपला गड शाबूत ठेवण्याचे शिवधनुष्य दिले आहे. तर शिवसेनेच्या मंजुळाबाई जहागीरदार धनुष्यबाण घेऊन आमदारकीच्या लढाईत पराभूत झालेल्या साधना गवळी निवडून येतात की राष्ट्रवादीच्या उषा बच्छाव यांना मतदार मतांचे दान करतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.
पक्षांना बंडखोरी भोवणार !
By admin | Published: February 16, 2017 11:12 PM