लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘राष्टÑीय बेरोजगार रजिष्टर’ अभियानाचा भाग म्हणून जिल्हा ते देशपातळीवर ‘यंग इंडिया के बोल’ या विषयावर ‘सुशिक्षित बेरोजगार’ स्पर्धा भरविण्यात येणार असून, या स्पर्धेतील विजेत्यांची थेट पक्षाचे प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती युवक कॉँग्रेसचे नेते राष्टÑीय प्रवक्ते सुबोधजी हरितवाल यांनी दिली.
केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीए कायदा देशपातळीवर लागू केला असून, या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने देशपातळीवर ‘मिसकॉल’च्या माध्यमातून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला विरोध म्हणून युवक कॉँगे्रसने देशपातळीवर ‘राष्टÑीय बेरोजगार रजिष्टर’ नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. देशपातळीवर सुशिक्षित बेरोजगारांसाठी कॉँग्रेसने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील बेरोजगार युवकांची गोळा झालेली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे हरितवाल यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून ‘यंग इंडिया के बोल’ हे नवीन माध्यम हाती घेऊन बेरोजगारांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यासाठी बेरोजगारांनी आपली नोंदणी करून जिल्हापातळीवर स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्हा, राज्य व देशपातळीवर कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत स्पर्धा होऊन त्यातील विजेत्यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावर नेमण्यात येणार असल्याचेही हरितवाल यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची मुदत ३ मार्चपर्यंत असून, ८ मार्च रोजी ही स्पर्धा घेण्यात येईल. तटस्थ परीक्षकांद्वारे या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल व १५ मार्च रोजी राज्यपातळीवरील स्पर्धा होणार असल्याची माहिती युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिली.