नाशिक : पदवीधर निवडणुकीच्या नोेंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असली आणि कमी मतदार नोंदणी झाल्याचे सांगितले जात असल्याने काही उमेदवारांनी आता स्वत:च पदवीधर मतदार नोंदणी फॉर्मसह स्वपक्षाचे लेबल आणि स्वत:ची छबी असलेले विशिष्ट फॉर्म देऊन आपला प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे.कॉँग्रेसकडून पदवीधर निवडणुकीसाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी देण्यात आली असून, भाजपाच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे नातलग डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता जिल्हा निवडणूक शाखेच्या नाशिक पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू केले असून, त्यासाठी मतदारांना दोन पानांचे फॉर्म भरून द्यावे लागणार आहे. अगोदर मतदान केलेल्या मतदारांनाही निवडणूक शाखेने नव्याने फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी पदवीधर मतदार नोंदणी फॉर्मसोबत त्यांची छबी असलेला फॉर्मही जोडून त्यावर मतदारांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, तसेच ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक एक पासपोर्ट फोटो तसेच आधार कार्ड, पदवीचे गुणपत्रक, निवास राहत असल्याचा पत्ता यांसह अन्य बाबींच्या छायांकित प्रती जोडून मतदारांकडून मतदार नोेंदणी फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे. यामागील हेतू उमेदवारांना मतदारांशी आयतीच माहिती व संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध होणार आहे. कॉँग्रेस आणि भाजपा यांनी आपापल्या पक्षीय पातळीवर हे पदवीधर मतदार नोेंदणीचे फॉर्म वाटप सुरू केले असून, हातोहात हे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
नोेंदणीतही उमेदवारांचे पक्षीय ‘राजकारण’
By admin | Published: October 21, 2016 1:45 AM