नाशिक : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले धार्मिक स्थळे नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर खुली होताच, गुरूवारी (दि.७) त्याचे निमित्त साधत राजकीय पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रत्येक पक्षाने देव-देवतांची मंदिरे गाठून देवाला साकडे घातले तर, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांना भेटी देऊन सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले. आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने धार्मिक स्थळे उघडण्याची कृती देखील राजकीय ठरली असून, चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यासाठी धार्मिक स्थळे उघडण्याची बाब देखील कारणीभूत ठरली आहे. गुरूवारी (दि. ७) ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाजप, सेनेच्यावतीने आरती करण्यात आली तर, राष्ट्रवादीच्या शेफाली भुजबळ यांनीही मंदिरात जाऊन अभिषेक केला. राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी यासाठी आग्रही असलेल्या भाजपाने मंदिरे आपल्यामुळेच उघडल्याचा दावा केला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या नांदुरी येथील श्री सप्तश्रृंगी देवीची विधिवत पूजा करून राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होवो असे साकडे घातले. माजी आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील श्री शनैश्वर मंदिरात पूजा-अर्चा केली तर, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिराचे दर्शन घेतले. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शालीमार चौकातील दुर्गा देवी माता मंदिरात महाआरती करून देवीला ‘दार उघड बये, दार उघड’ असे साकडे घातले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली असली तरी, मंदिरातील नियमित पूजा-अर्चा करण्यास शासनाने अनुमती दिलेली होती. फक्त भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आलेली हाेती. ही बंदी गुरूवारी उठविण्यात आल्याने आता सर्व धार्मिकस्थळे भाविकांनी गजबजणार असल्याने निवडणूक इच्छुकांना आपल्या राजकीय प्रचारासाठी हे निमित्तही पुरेसे ठरले आहे. गुरूवारी शहराच्या विविध भागात असलेल्या धार्मिक स्थळांना निवडणूक इच्छुकांनी भेटी देऊन आपली पर्वणी साधली. त्यात स्थानिक नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
चौकट====
राष्ट्रवादीचे सर्वधर्मीय प्रेम
राष्ट्रवादी काँग्रेसने धार्मिकस्थळे उघडण्याचा मुहूर्त साधत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेटी देऊन दर्शन घेतले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील ग्रामदैवत कालिका मंदिरात पूजा-अर्चा केल्यानंतर शिंगाडा तलाव येथील गुरूद्वारावर माथा टेकला त्याच बरोबर जुन्या नाशकातील मुस्लीम धर्मीयांच्या बडी दर्गा येथेही दर्शन घेतले. शेफाली भुजबळ यांनी नाशिकरोडच्या बाल येशू मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.