मालेगाव : विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. मालेगाव आगारातून ५६ बसेस निवडणूक कामकाजासाठी दिल्यामुळे नियोजित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही मतदान कर्मचारी निवडणूक कामासाठी जाण्यासाठी, तर महत्त्वाच्या कामासाठी जाणारे प्रवासी बसेससाठी तटकळत उभे होते. बाहेर गावच्या आगारातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या येतात की नाही याचीही काही शाश्वती नसल्यामुळे स्थानकप्रमुखांनाही गाड्यांबद्दल बद्दल स्पष्ट माहिती देता येत नव्हती. बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मालेगाव आगारप्रमुख किरण धनवटे यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून चौकशी खिडकीजवळ तशा आशयाचा फलक लावलेला आहे. प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.
बसेस अभावी प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:00 AM