सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर सिन्नरजवळील मोहदरी घाटात नारळ घेऊन जाणाऱ्या मालट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो समोरून येणाऱ्या ट्रेलरवर जाऊन आदळला. यावेळी ट्रेलरच्या पाठीमागून जाणाऱ्या दुचाकीलाही धक्का लागला. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली. अपघात किरकोळ असला, तरी तो मोहदरी घाटाच्या वळणावर झाल्याने वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला. यामुळे सुमारे चार तास वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.आंध्र प्रदेशातून नाशिकला नारळ घेऊन जाणाऱ्या मालट्रकचे (क्र. एपी १६ टीएक्स ४३२४) ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. याचदरम्यान नाशिकरोडकडून लोखंडी रॉड व इतर लोखंडी साहित्य माळेगाव औद्योगिक वसाहतीत घेऊन येणाऱ्या ट्रेलरवर (क्र. एमएच १५ सीके १८०२) ट्रक धडकला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी मोहगावातील युवक आपल्या दुचाकीहून (क्र. एमएच १५ सीएक्स ३४३) सिन्नरकडे येत असतांना त्यालाही धक्का लागला. या अपघातात तो किरकोळ जखमी झाला. मोहदरी घाटाच्या पायथ्याशी वळणावर झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. सकाळी ९वाजेपासून दुपारी १वाजेपर्यंत वाहने अडकून पडली होती. सिन्नर पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी तुषार मरसाळे, सोमनाथ बोऱ्हाडे, सचिन मराठे, सुशांत मरकड, लक्ष्मण बदादे, बाळनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सुमारे चार तासानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला हटविण्यात आल्यानंतर हळूहळू वाहतूक कोंडी कमी झाली. यामुळे मोहदरी घाटात दुर्तफा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिवाळीच्या सुट्टीमुळे नाशिक-पुणे महामार्गावर मोठी वर्दळ आहे. याशिवाय शिर्डीला जाणाऱ्या भाविकांमुळे वाहतुकीचा भार वाढला आहे. अशा परिस्थितीत मोहदरी घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काही माहितगार वाहनचालकांनी जामगाव, पास्तेमार्गे पर्यायी मार्गाने आपली वाहने नेल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. (वार्ताहर)
प्रवाशांचे हाल : नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात अपघात; वाहनांच्या दुर्तफा रांगा
By admin | Published: November 01, 2014 9:57 PM