नाशिक- महापालिकेच्या बस सेवेला अद्याप प्रारंभ नाही, मात्र केवळ चाचणी करण्यासाठी दोन बससाठी हजारो रूपयांचे शुल्क आरटीओला भरावे लागले आहे. या दोन डिझेल बस केवळ रात्रीच्या वेळी सॉफ्टवेअर चाचणीसाठीच चालवल्या जात आहेत.
नाशिक महापालिकेच्या बस सेवेची तयारी पूर्ण झाली असली तरी केवळ वाहतूक परवाना नसल्याने ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी बस सेवा सुरू करण्याचा मुहूर्त टळला आहे. त्यानंतर फेबु्वारी महिन्यात बस सेवा सुरू करायचे ठरले असले तरी अद्याप परवाना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ही सेवा सुरू झालेली नाही. ही बस सेवा सुरू झाली नसली तरी प्रशासन त्यांच्या स्तरावर तयारी मात्र वेगाने करीत आहेत. बस ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची चाचणी देखील करीत आहेत. बस चालवण्यासाठी दिलेल्या वेळेत बस धावते किंवा नाही तसेच ठराविक किलोमीटरनुसार नोंदी दाखवल्या जातात किंवा नाही, याची चाचणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या खासगी प्रवासी वाहतुकीसाठी बस रस्त्यावर आणायची असेल तर सुमारे पस्तीसशे रूपये प्रति सीट याप्रमाणे बस कंपनीला आरटीओचे शुल्क भरावे लागते. दोन डिझेल बस चाचणीसाठी रस्त्यावर आणण्यात आल्याने एका मिनी डिझेल बसचे ९१ हजार असे दोन बसचे जवळपास दोन लाख रूपये संबंधित ठेकेदाराला भरावे लागले असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी मनपाचे अधिकारी आणि बस चालक चाचपणी करीत आहे.
इन्फो...
वेबसाईट, ॲप लवकरच सुरू होणार
नाशिक महापालिकेच्या बस सेवेविषयी उत्सुकता असल्याने बस सेवा लवकर सुरू हाेत नसली तरी किमान उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी लवकरच नाशिक महानगर परिवहन महामंडळाची वेबसाईट सुरू होणार आहे. ॲप देखील नागरिकांसाठी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.