नाशिक : औद्योगिक कलह कायदा १९४८ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा व एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी यासह अन्य आठ न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) ने पुकारलेल्या बेमुदत संपला एस.टी. कर्मचाऱ्यांच्या अन्य कास्ट्राईब संघटना, कामगार संघटना, सेना यांच्याशी संलग्न असणारे कर्मचारी येवल्यात कामगार हितासाठी या बेमुदत संपात स्वयंंस्फूर्तीने सहभागी होऊन त्यांनी एल्गार पुकारला व उत्स्फूर्त काम बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी केले. त्यामुळे गुरु वारी पहाटेपासून येवला आगारातून एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणीत येताना १३ टक्के कराराचा फायदा देण्यात यावा, सन २००० ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे त्यांना नियमित वेतनश्रेणी द्यावी, चालक-वाहक यांचे ड्यूटी अलोकेसन संगणकीकृत करून टी-९ रोटेशनची अंमलबजावणी करण्यात यावी, चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणकीकृत रजा व्यवस्थापक लागू करावा, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार सोयीसवलती द्याव्यात या मागण्यांसाठी एस. टी. कर्मचारी संपात उतरले आहेत. येवल्यात काम बंदगुरुवारी सकाळी येवला बस आगाराचे चालक-वाहक आणि यांत्रिक अशा २४१ कर्मचाऱ्यांनी बस आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन काम बंद केले व घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे आपल्या पोलीस ताफ्यासह बस आगारात आले. परंतु न्याय्य मागण्यांसाठी असलेल्या लढ्यात कर्मचारी असल्याने त्यांनी शांततामय मार्गाने आपले आंदोलन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, प्रवाशांना याची फारशी कल्पना नसल्याने प्रवाशांची बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. बसेस आगाराच्या बाहेर येण्याची कोणतीच चिन्हे प्रवाशांना दिसेना. दरम्यान, एस.टी.चे वाहक, चालक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बसेस ताब्यात घेण्यास प्रशासनास नकार दिला व हे कर्मचारी थेट बसस्थानकात आले. कामानिमित्त बाहेरगावी जाणे गरजेचे असलेल्या प्रवाशांनी खासगी वाहनांनी जाणे पसंत केले. दुपारी १२.३० च्या सुमारास सुरेश गोंधळी, राजेश भंडारी, प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, राजेश गणोरे यांनी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले व आगारप्रमुख उत्तमराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. (लोकमत चमू)
बसच्या चक्का जाममुळे प्रवाशांचे हाल
By admin | Published: December 17, 2015 10:42 PM