नाशिकरोड : नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला पाऊण तास उशीर झाल्याने संतप्त प्रवाशांनी गुरुवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पंचवटी एक्स्प्रेस रोखून धरत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. मुंबई-ठाणे येथे दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदि कामांसाठी जाणाऱ्यांना पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वाची रेल्वे आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पंचवटी एक्स्प्रेस काही मिनिटे उशिरा येत आहे. तर मनमाडला भीषण पाणीटंचाई असल्याने उशिरा येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पाणी भरले जात असल्याने गाडीला अजून उशीर होतो. गुरुवारी रेल्वे प्रशासनाने दुरांतो एक्स्प्रेस पुढे काढण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस रोखून धरल्याने ७ वाजून ५ मिनिटांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर येणारी पंचवटी एक्स्प्रेस तब्बल पाऊण तास उशिराने दाखल झाली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी पंचवटी एक्स्प्रेस रोखून धरत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. यामुळे पंचवटीला आणखी १५ मिनिटे उशीर झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी पंचवटीची निर्धारित वेळ राखण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी ८ वाजेच्या सुमारास पंचवटी एक्स्प्रेस रवाना झाली. (प्रतिनिधी)
प्रवाशांनी पंचवटी एक्स्प्रेस रोखली
By admin | Published: March 03, 2016 11:43 PM