पंचवटी : एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने त्याचा परिणाम शहर बससेवेवर झाला. पहाटेच्या सुमाराला पंचवटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बस सकाळी नऊ वाजेनंतर बाहेर पडल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा फटका परिवहन मंडळासह प्रवाशांना बसल्याचे दिसून आले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी रात्रीच्या सुमाराला पंचवटी आगारातील तब्बल ७० हून अधिक बसच्या चाकांची हवा सोडल्याने बस उभ्याच होत्या. दैनंदिन पहाटे साडेचार वाजेपासून आगारातून बाहेर पडणाऱ्या बस सकाळी नऊ वाजेपर्यंत बाहेर न पडल्याने कामगार, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना या आंदोलनामुळे कामावर जाण्यास विलंब झाला. काहींनी रिक्षाने इच्छितस्थळी प्रवास केला, तर काहींनी कामावर दांडी मारणे पसंत केले. पंचवटी आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना असून यातील काही संघटनांचे सभासद रस्त्यावर उतरल्याने त्याचा परिणाम बससेवेवर झाला. सकाळी नऊ वाजेनंतर आंदोलनात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांनी एसटी बस बाहेर काढण्यास सुरुवात केल्यानंतर शहर बससेवा पूर्ववत झाली. पंचवटी आगारातून दैनंदिन १८० बस बाहेर पडतात. मात्र गुरुवारच्या आंदोलनामुळे दुपारी साडेबारा वाजेपावेतो केवळ १२० बस आगारातून बाहेर पडल्या होत्या. आठ वाजेनंतरही बस रस्त्यावर दिसत नसल्याने प्रवाशांची चांगलीच ओढाताण झाली. (वार्ताहर)
प्रवाशांची पायपीट
By admin | Published: December 18, 2015 12:21 AM