नाशिक : महापालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला नाशिककरांचा प्रतिसाद लाभत आहे. या बससेवेचे तिकीट बुकिंग, बसचे मार्ग, वेळ, थांबे याबाबतची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेचे हे सर्व कामकाज ज्या ठिकाणाहून चालते, त्या कंट्रोल रुमचे कामकाज बघण्याची संधी नाशिककरांना दर शनिवारी मिळणार आहे. ४ जूनपासून हा उपक्रम सुरू होणार आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ (सिटीलिंक) ची बससेवा अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरली आहे.
या बससेवेचे सर्व मार्ग, वेळा याबाबतची माहिती प्रवाशांना ऑनलाईन बघता येते. त्यामुळे प्रवाशांना देखील सिटीलिंकचे कामकाज कसे चालते, याबाबत उत्सुकता असते. त्यामुळेच सिटीलिंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या सूचनेनुसार सिटीलिंकने दर शनिवारी आपली कंट्रोल रूम बघण्याची आणि तेथील कामकाजाची माहिती जाणून घेण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून बससेवेवर कसे नियंत्रण ठेवले जाते, बस कोणत्या थांब्यावर उभी राहते, कोणत्या मार्गावरून किती वाजता फेरी सुरू केली, केव्हा फेरी संपली, जीपीएस यंत्रणा कशी काम करते, याबाबतची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे.
---------
दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एकावेळी केवळ १० व्यक्तींनाच कंट्रोल रुम बघता येईल. त्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत संपर्क करून तारीख निश्चित करता येईल. शनिवार (दि. ४ जून) हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.