नाशिक : पेस्टकंट्रोलच्या ठेक्याला वारंवार मुदतवाढ देताना डासप्रतिबंधक धूर-औषध फवारणीत पडलेला ९६ दिवसांचा खंड ह्यामुळे मागील वर्षी शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. यंदाही डेंग्यूने डोके वर काढण्यास सुरुवात केली असून सप्टेंबर महिन्यात ५३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक धास्तावले असताना महापालिकेत मात्र पेस्टकंट्रोलचा नव्याने ठेका देण्यावरून चालढकल सुरूच आहे. दरम्यान, स्थायी समितीने पेस्टकंट्रोलबाबतचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्तांनी सदर प्रस्ताव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवल्याच्या चर्चेने स्थायी समिती व प्रशासन यांच्यात जुंपली आहे. मागील वर्षी शहरात कधी नव्हे इतका डेंग्यूचा उद्रेक झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी डेंग्यूच्या उद्रेकास मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले होते शिवाय पेस्टकंट्रोलच्या ठेक्याला वारंवार मुदतवाढ देण्याच्या नादात डासप्रतिबंधक धूर व औषध फवारणीत ९६ दिवसांचा खंड पडल्याचा आरोपही करण्यात आला होता. डेंग्यूच्या आजाराने सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेच्या पतीचा बळी गेल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली.
पेस्टकंट्रोलची चालढकल
By admin | Published: October 02, 2015 10:48 PM