नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दराने शंभरी पार केल्याने अनेक नोकरदारवर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दररोज वाहनांमध्ये पेट्रोल भरणाऱ्यांना खर्चाची तजविज करताना कसरत करावी लागत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
फळांचे दर वाढले
नाशिक : शहरातील बाजारपेठेत फळांची आवक कमी झालेली असल्याने दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या फळांना मागणी वाढली आहे. विशेषत: सफरचंद, मोसंबी, संत्रीसह किवी, ड्रॅगणफ्रुट, आदी फळांनी अधिक मागणी असून, या फळांचे दर वाढले असून, सफरचंद २२० ते २४० रु. किलो आहेत.
वटवृक्ष रोपांचे वाटप
नाशिक : वडसावित्री पौर्णिमेनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था आणि काही नगरसेवकांच्या माध्यमातून वटवृक्षाच्या झाडाची रोपे वाटण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या रोपांची लागवड करून ते जोपासण्याचा संकल्पही अनेकांनी केला आहे.
शेतकऱ्यांना पावसाची चिंता
नाशिक : संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यावर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला होता; मात्र पावसाने तो खोटा ठरविल्याने अद्याप पेरण्यांना फारशी सुरुवात झालेली नाही. जून महिन्यात बऱ्यापैकी पेरण्या आटोपत असल्या तरी यावर्षी अद्याप पेरण्यांना वेग आलेला नाही.
कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शहरातील जवळपास सर्वच आस्थापनांचे व्यवहार सुरळीत झाले आहेत. या काळात कोरोना नियमांचे पालन न केल्यास आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे; मात्र अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
मजुरांच्या हातांना मिळाले काम
नाशिक : शहरातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर रामकुंड परिसरात धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. यामुळे या परिसरात रोजंदारी करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या मजुरांना रोजगार मिळू लागला आहे. त्याचबरोबर व्यावसायीकांच्या व्यवसायांनाही चालना मिळाली आहे.
इच्छुकांचा हिरमोड
नाशिक : ओबीसी आरक्षणामुळे आगामी महापालिका निवडणुकांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. ऐन कोरोनाच्या काळातही अनेकांनी निवडणुकांची तयारी सुरू ठेवली असून, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला जात आहे.