सातपूर : योगगुरू रामदेवबाबा आपल्या पतंजलीच्या उत्पादनासाठी नाशिकला मोठी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. ही गुंतवणूक नाशिकला झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाला जागेचा शोध घेण्यास सांगितले आहे. पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आयमा औद्योगिक प्रदर्शन- २०१७च्या माहिती पुस्तिकेच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. महाजन यांनी सांगितले की, शहराच्या विकासात औद्योगिक वसाहतीचे मोठे योगदान आहे. मात्र औद्योगिक वसाहतीला मूलभूत सुविधा पुरेशा मिळत नाहीत हे सत्य आहे. कदाचित विमानतळामुळे अडथळा येत असेल, मात्र नाशिकच्या उद्योग विकासासाठी शासन स्तरावर निश्चित असे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देत योगगुरु रामदेवबाबा नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याची सुखद माहिती त्यांनी यावेळी दिली. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले व स्वागत केले, तर आयमा इंडेक्स २०१७ चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी या प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली व औद्योगिक प्रदर्शनासाठी नाशिकला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी. त्या जागेवर प्रदर्शन केंद्र उभारून त्याचे व्यवस्थापन एमआयडीसी किंवा डीआयसी यांच्याकडे द्यावे, अशी मागणी केली. सूत्रसंचालन वरुण तलवार यांनी केले. स्वागत एस. एस. आनंद यांनी केले. निखिल पांचाळ यांनी आभार मानले. यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष विवेक पाटील, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, संजय महाजन, आशिष नहार, प्रकाश बारी, व्हीनस वाणी, राजेंद्र कोठावदे, श्रीधर व्यवहारे, मंगेश काठे, नेहा म्हैसपूरकर, शर्मिला साळी, प्रज्ञा पाटील, प्रेरणा बेळे, महेश सुतार आदिंसह उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)
नाशकात पतंजलीची गुंतवणूक
By admin | Published: December 21, 2016 10:53 PM