त्र्यंबकेश्वर : वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आज प्रस्थान झाले. विठू नामाचा गज करत या पालखी सोहळ्यात जिल्ह्यातील सुमारे १५ हजार भाविक सामील झाले आहेत. पालखी प्रस्थानाच्यावेळी वरूण राजाने हजेरी लावली. पंढरपूर वारीसाठी संत निवृत्तिनाथांच्या पालखीबरोबर जिल्ह्यातील हजारो भाविक वारकरी सहभागी झाले आहेत. तर नाशिक जिल्हा सोडल्यानंतरही अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून भाविक वारीत दाखल होत असतात. यंदा पालखीच्या २५ दिवसांच्या प्रवासाचे नियोजन संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानने केले आहे. २६ व्या दिवशी पालखी श्रीक्षेत्र पंढरपुरात पोहोचणार आहे. संत निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा दि. १० जुलै रोजी अहमदनगर येथे होणार आहे. आषाढी एकादशी वारी पंढरपूर येथे २३ जुलै रोजी आहे. या वारीच्या पूर्वसंध्येला संत निवृत्तिनाथांची पालखी दि.२२ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल. दशमीपासून ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस निवृत्तिनाथ दिंडीचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो. पौर्णिमेला दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालखी परतीच्या प्रवासाला पंढरपुरातून त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करेल. पालखीचा पंढरपूर पोहोचण्याचा मार्ग २६ दिवसांचा असतो तर परतीचा मार्ग १८ दिवसांचा असतो.
पाऊले चालती पंढरीची वाट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:52 PM