नाशिक : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, संतांनी सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी दिलेले विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. याच विचारातून घडलेल्या व्यक्ती आजही समाजात आहेत. परंतु, त्यांना ओळखायचे कसे हा सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रश्न असतो. याचे उत्तर अगदी सोपे असून दुसऱ्याचे दु:ख पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी येते ती व्यक्ती म्हणजे संत असते. दुसºयाचे दु:ख ओळखून त्यात सहभागी होण्याचा सल्ला आपल्याला देत ते असतात. त्यामुळे समाजातील दु:ख कमी करण्यासाठी आपण सर्वांनी संतांनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कीर्तनकार युवराज भट सिन्नरकर यांनी केले.वामनबुवा प्रल्हादशास्त्री भट (सिन्नरकर महाराज) पुण्यतिथी सोहळा, सेवा समिती नाशिक यांच्यातर्फे पारिजातनगर येथील ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात रविवारी (दि.१०) कीर्तन संमेलनात त्यांनी ‘संतांचिये वाटे वाट चालू आता’ विषयाला अनुसरून उपस्थिताना संत महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार आचरण करण्याचा सल्ला दिला. तत्पूर्वी श्रीकृष्णबुवा सिन्नरकर, युवराज भट, चंद्रशेखर वैद्य, डॉ. उमेश धारणे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व वामनबुवा भट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अचलाताई वाघ यांनी भक्तीचा महिमा भाविकांना विविध दृष्टांच्या माध्यमातून पटवून दिला.
संतांचिये वाटे वाट चालू आता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 1:23 AM