नाशिक : सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवास खडतर असला तरी जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सत्याच्या मार्गावर दृढविश्वास आणि निष्ठेने मार्गक्रमण केल्यास कोणत्याही क्षेत्रात निश्चित विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दसरा उत्सवानिमित्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते शस्त्रपूजा व अश्वपूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी विद्यालयाचे संस्थापक डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयातील सर्व शस्त्रास्त्रांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व अश्वांचेही पूजन करण्यात आले. सिंगल म्हणाले, दसरा सणातून सत्याचा असत्यावर विजय होत असल्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे संपूर्ण जीवनभर याचा विसर पडू देऊ नका, जीवनात ध्येय ठेवा, सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण केल्यास विजय निश्चित मिळतो. तसेच प्रत्येकामध्ये देश, राष्ट्रभक्ती, देशाचे संविधान या बाबींचा गर्व बाळगतांनाच ज्ञान मिळवा, ज्ञानी बना. कारण ज्ञान हीच खरी शक्ती असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य सांभाळण्याचाही सल्ला दिला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आशुतोष रहाळकर, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, भोसला मिलिटरी स्कूलचे (विद्यार्थी) अध्यक्ष अतुल पाटणकर, उपाध्यक्ष प्रशांत नाईक, संस्थेचे पदाधिकारी नरेंद्र वाणी, हेमंत देशपांडे, शीतल देशपांडे, मंगला सवदीकर, भोसला मिलिटरी स्कूलचे समादेशक मेजर चंद्रसेन कुलथे, प्राचार्य चेतना गौड, भोसला मिलिटरी स्कूलच्या (विद्यार्थिनी) अध्यक्ष स्मृती ठाकूर, समादेशक सुप्रिया चित्रे, प्राचार्य डॉ. अंजली सक्सेना आदी उपस्थित होते.
सत्याच्या मार्गावर विजय निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:02 AM