लॉकडाऊन संदर्भात पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. यावेळी कोरोनासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पाथरे परिसरात कोरोनाचा वाढता प्रसार आणि प्रादुर्भाव लक्षात घेता १ ते ५ एप्रिलपर्यंत पूर्णपणे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दवाखाने, मेडिकल, अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. फेरीवाले, बाहेरील व्यापारी यांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला आहे. आठवडे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. दूध संकलनासाठी सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी सात ते नऊ हा कालावधी ठेवण्यात आला आहे. विनामास्क प्रत्येक व्यक्तीस दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विनाकारण चौकात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये तसेच ६० वर्षांवरील व्यक्ती किंवा लहान बालकांनी गावात फिरू नये. स्वतःची , कुटुंबाची, आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. या काळात घरीच राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलीस कर्मचारी या काळात देखरेख ठेवणार आहेत. या बैठकीसाठी पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सहायक पोलीस निरीक्षक वावी पोलीस ठाणे, आरोग्य विभाग यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथरे गाव पाच दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:15 AM