पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव (पाथरे) येथे कोरोना रुग्ण आढळल्यापासून ग्रामस्थांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले. सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. यापुढेही शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठाडे यांनी पाथरे येथे कृतज्ञता फेरी च्यावेळी ग्रामस्थांना केले.सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे दोन कोरोना रुग्ण आढळल्यापासून आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती पदाधिकारी यांनी सतत १४ दिवस कार्यरत राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. वारेगाव, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द तिन्ही गावच्या वतीने यासर्व कर्मचारी,पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातून कृतज्ञता फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठाडे, तहसीलदार राहुल कोताडे, आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी लता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, आरोग्य अधिकारी डॉ. अजिंक्य वैद्य, पोलीस कर्मचारी, वारेगाव, पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासन, कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.
पाथरेकरांची कृतज्ञता फेरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 8:34 PM