महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव शाम बुरकुल यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महासभा पार पडली. यावेळी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान मिळविण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. या विषयाला अनुसरूनच नगरसेविका आशाताई अहिरे यांनी त्यांच्या प्रभागातील चार रुग्ण मसगा कोविड सेंटरमध्ये दगावले आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. व्यवस्थित लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला. केंद्रावर तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी याबाबत शासनाकडे मागणी केली असल्याचे सांगितले. तर आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी एमबीबीएस व एम. डी. डॉक्टर येत असतील तर तातडीने हजर करून घेऊ, असे स्पष्ट केले. डॉ. ठाकरे यांनी महापालिका क्षेत्राबाहेरील तसेच जिल्हा बाहेरील रुग्ण महापालिकेच्या केंद्रात अधिक आहेत. यामुळे महापालिकेच्या यंत्रणेवर ताण येत असल्याचे सांगितले. नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी शहरात म्युकरमायकोसिसच्या स्थितीबाबत विचारणा केली. यानंतर नामकरणाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन महासभेच्या चर्चेत नगरसेवक मदन गायकवाड, सखाराम घोडके, नंदकुमार सावंत, रशीद शेख आदींसह नगरसेवकांनी सहभाग घेतला.
इन्फो
विद्युत दाहिनीचा प्रस्ताव
महापालिकेच्या मालकीच्या स्मशानभूमीमध्ये विद्युत व डिझेल दाहिनीसाठीचा प्रस्ताव, स. नं. १०७ मध्ये मदरसा, मशीद उभारण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या सहारा रुग्णालयात लिक्वीड ऑक्सिजन प्लांट, मनपाच्या दोन रुग्णालयात हेल्थ एटीएम मशीन, जम्बो ऑक्सिजन सिलिंडर खरेदी, मसगा व हज हाऊस येथे ५० सिलिंडर क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. इस्लामपुरा वॉर्डातील स. नं. ८८ मध्ये बेघरांसाठी आरक्षित जागेवर किरकोळ फेरबदल करून कारवाईचा विषय मंजूर करण्यात आला.
इन्फो
आरक्षित जागेबाबत चौकशी समिती
इस्लामपुरा भागातील स. नं. ७५ ही खासगी जागा विकास आराखड्यात खेळाचे मैदान व व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित करण्यात आले आहे; मात्र जागा मालक बेकायदेशीररित्या प्लॉटची विक्री करीत असल्याचे नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी सभागृहात सांगितले. यावर नगररचना अधिकारी संजय जाधव यांनी संबंधित मालकाने कागदोपत्री पूर्तता केली असल्याचे सांगितले. यावर नगरसेवक अन्सारी यांनी जाधव हे सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. या विषयावर दीर्घकाळ चर्चा झाली. महापौर ताहेरा शेख यांनी हस्तक्षेप करत यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करून चौकशी केली जाईल, असे सांगितले.