मिलिंद कुलकर्णी
नाशिक जिल्ह्यात अडीच महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली आली आहे. दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि जनतेने संयुक्तपणे आणि सहकार्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेले लॉकडाऊन रविवारी संपत असले तरी राज्य शासनाचे निर्बंध कायम राहणार आहेत. एक जून नंतरही काही निर्बंध कायम राहतील अशी शक्यता दिसते. त्यामुळे जनतेने आतापर्यंत दाखविलेला संयम पुढेही कायम ठेवावा लागेल. प्रशासनानेदेखील यंत्रणा सजग आणि सतर्क ठेवण्यावर भर द्यायला हवा.सद्य:स्थितीत जिल्ह्यात सोळा हजार रुग्ण उपचार घेत आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असे समाधानकारक आहे. आता खरे आव्हान बळी रोखण्याचे राहणार आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनामुळे जीव गमाविणाऱ्यांची संख्या स्थिर आहे. रोज ३० हून अधिक रुग्ण जीव गमावत आहेत. बळीची संख्या कशी कमी करता येईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोरोनाचे लवकर निदान होणे व त्याच्यावर तातडीने उपचार सुरू होणे या प्राथमिक बाबी असतानादेखील दुसऱ्या लाटेतही नेमक्या याच गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात चाचणी आणि आणि उपचार या दोन्ही गोष्टीत विलंब होत आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा वर्षभर अथकपणे कार्यरत असताना आता त्यांना सहायक व पूरक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. हे झाले तरच बळींची संख्या आटोक्यात येऊ शकेल.कोरोनानंतरचे आजारदेखील गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहेत. म्युकरमायकोसिस या आजाराने थैमान घातले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या दलाकडून विशेष अपेक्षा राहणार आहेत. कोरोना तसेच अन्य आजारांवर तातडीने उपचार, तसेच उपचारांसाठी आवश्यक असलेली औषधे तत्काळ आणि वाजवी दरात मिळावी, याकडे विशेष दलाने लक्ष घालावे.लसीकरणाचा घोळ या आठवड्यातही कायम होता. शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने शहर व ग्रामीण भागात लसीकरण ठप्प झाले आहे. जे सुरू आहे, ते मोजक्या प्रमाणात आहे. महापालिकेने लस स्वतः खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातही मुंबई-पुणे महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मध्येच ही खरेदी करण्याचे सूचित केले गेले. त्यामुळे सगळे तळ्यात-मळ्यात असेच दिसते. इतरवेळी युरोप, अमेरिकेची उदाहरणे तोंडावर फेकणारे आम्ही तिथल्या लसीकरणाचा आदर्श कधी घेणार? त्याप्रमाणे प्रयत्न कधी करणार, हा प्रश्न सामान्यांच्या मनात निश्चित येत आहे.गुंडांचा बीमोड करानाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. रहिवासी भागात चारचाकी वाहनांच्या काचा फोडणे, घरात घुसून महिला व बालकांना मारहाण करणे, रस्त्यावर वाहनधारकांना लुटणे असे प्रकार वाढले आहेत. एकीकडे पोलीस दलाकडून संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ह्यमोक्काह्णचा वापर केला जात असताना गावगुंडांची हिंमत वाढली आहे. ही विषवल्ली वेळीच ठेचली नाही तर धाडस वाढत जाऊन मोठी गुन्हेगारी फोफावेल. पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच गुंडगिरी वाढते, हे उघड सत्य आहे. संकुचित राजकारणासाठी असे ब्रह्मराक्षस उभे केल्यास ते संपूर्ण समाजालाच वेठीस धरतात, ही उदाहरणे आहेत. यातून बोध घ्यावा.