नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मनोरुग्ण कक्षाच्या खिडकीतून तरुण मनोरुग्णाने उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षात सुनील रामदास शिंदे (२७, रा. देवळाली गाव) यास चार दिवसांपूर्वी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सुनील याने रविवारी (दि.३) रात्री उशिरा त्याच्या वडिलांच्या हाताला हिसका देऊन मनोरुग्ण कक्षाचे स्वच्छतागृह गाठले. त्यानंतर स्वच्छतागृहाच्या खिडकीची झडप बाजूला करून त्याने खिडकीतून बाहेर उडी घेतली. यामुळे सुनील गंभीर जखमी झाला. त्याच्या हातापायांसह शरीराला जबर मार लागल्याने अतिदक्षता विभागात उपचारार्थ तत्काळ दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. रुग्णालयांमधून उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याच्या घटना सुरूच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातून अशाच प्रकारे मूत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांनी महिनाभराच्या अंतरात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील अशाच प्रकारे दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती झाली.सुनील याच्यावर मनोरुग्ण कक्षात उपचार सुरू होते. त्याच्यासोबत त्याचे वडील रामदास शिंदे हेदेखील दिवस-रात्र थांबून होते. मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास सुनीलने त्यांच्या हाताला हिसका देत खिडकीतून बाहेर उडी मारली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोन महिन्यांमध्ये ही तिसरी घटना घडली आहे.
मनोरुग्ण कक्षातून रुग्णाने घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:47 AM