नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठीच्या प्रचाराला प्रारंभ करणाऱ्या दिनकर पाटील यांनी आता बरीच पुढची मजल मारली असली तरी हाच त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी विरोधाचा मुद्दा केला आहे. पक्षाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसताना त्यांनी सुरू केलेल्या प्रचारामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांची अडचण वाढविली असून, थेट श्रेष्ठींकडे तक्रारी केल्या आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर पाटील लढण्यास इच्छुक होते; मात्र युती झाल्याने त्यांची कोंडी झाली. त्यानंतर पाटील यांनी विधानसभा मतदारसंघावर दावा केला; परंतु लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांचा प्रचार करतानाच पाटील यांनी स्वत:च आमदार म्हणून प्रचार सुरू केल्याने त्यावेळीदेखील पक्षातील अनेक निष्ठावंत दुखावले होते. त्यावेळेपासूनच पाटील यांच्या विरोधात तक्रारी करण्यास प्रारंभ झाला होता. पाटील यांनी तेवढ्यावरच न थांबता मतदारसंघात स्वत:ची प्रचार यंत्रणा राबवून आमदारकीची दावेदारी उघड केली आहे. उघडपणे सांगितले जात आहे. भाजपत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाशिवाय अशाप्रकारे परस्पर स्वत:ची उमेदवारी घोषित करण्याची परंपरा नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांना पक्ष शिस्तच ठाऊक नसल्याची तक्रार श्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.एसएमएसमुळेदेखील अडचण !पाटील यांनी सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी एसएमएसचा मारा चालविला आहे. त्यावरदेखील पक्षातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. पक्षाकडून परवानगी तर नाहीच उलटपक्षी हेच निष्ठावान आणि आध्यात्मिक असल्याचे सांगून त्यांना उमेदवारी देण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षात हेच एकमेव उत्तम उमेदवार आहेत का आणि त्यांना अशाप्रकारे लोकांमध्ये जाऊन उमेदवारी मागण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न पक्षातून केला जात आहे.
उमेदवारीच्या अतिघाईने पाटील अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:06 AM