नाशिक : पेठ उपविभागीय अधिकाऱ्याच्या नावे हॉटेलचालकांकडून पोलीस कर्मचारी विलास पाटील हा पाच हजार रुपयांची हप्तावसुली करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता़ या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून पाटील फरार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़ पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेले पोलीस कोठडी सुनावण्यात आलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सिरसाट व अहिरे या दोघांचा निलंबनाचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ दरम्यान, हप्तेखोरीच्या दुसºया व्हिडीओतील राजू वायकांडेचा अहवाल अधीक्षकांनी मागविला आहे़
पेठ उपविभागीय अधिकारी सचिन गोरे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर प्रभारी नियुक्ती करण्यात आलेले पोलीस निरीक्षक डी़ आऱ पाटील यांच्या नावे पोलीस कर्मचारी विलास पाटील हा पाच हजारांची हप्तेवसुली करीत होता़ या वसुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तो पोलीस व एसीबी या दोघांनाही चकवा देत आहे़ त्याच्याविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसºया घटनेत फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना साहाय्य करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना पुणे एसीबीने रंगेहाथ पकडलेले ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक राजेश सिरसाठ व संजीव अहेर या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या दोघांचेही अहवाल तयार करण्यात आले असून त्यांचे शनिवारी निलंबन करण्यात येणार आहे़
हप्तेखोर विलास पाटील याच्या सोशल मीडीयावरील व्हायरल व्हिडीओनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनावरील पोलीस कर्मचारी राजू वायकांडे यांचाही हप्तेवसुलीचा व्हिडीओ गुरुवारी (दि़१५) व्हायरल झाला़ यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी वायकांडे यांचाही अहवाल मागीतला असून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणारआहे़ दरम्यान,फरार पोलीस कर्मचारी विलास पाटील यास न्यायालयातून अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी जाणूनबुजून वेळ दिला जात असल्याची चर्चा आहे़