सातपूर : सातपूर विभागातील शिवाजीनगर आणि परिसरात गेल्या तीस वर्षांपासून दिनकर पाटील आणि दशरथ पाटील यांचे नेतृत्व राहिले आहे. यात कधी भाऊ-भाऊ, तर कधी काका-पुतण्या अशी लढत संपूर्ण शहराने अनुभवली आहे. वर्चस्ववादाच्या लढाईत एकमेकांविरोधात लढून पाटीलकी सिद्ध करीत आहेत. या प्रभागात राजकीय पक्ष नव्हे तर पाटलांचे प्रभुत्व राहिले आहे. गेल्या २५ वर्षांत भाजपचा एक कार्यकर्ता नसलेल्या या भागात दिनकर पाटलांमुळेच पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. आता पाटील विरुद्ध पाटील अशीच लढत रंगणार की दोघांच्या भांडणात तिसरा कोणी बाजी मारणार, हा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये दिनकर पाटील यांनीच भाजपला जवळ करून आपल्या मर्जीतील अन्य तीन उमेदवार घेऊन त्यांना निवडून आणले आणि भाजपचे नशीब फळफळले. मागील निवडणुकीत रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांना आरक्षणाचा फटका बसल्याने लोंढे यांनी धाव घेतली होती. मात्र, पाटील यांच्यामुळेच लोंढे यांना पराभव पत्करावा लागला होता. दिनकर पाटील यांच्याविरोधात दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांनी निवडणूक लढविली होती. मात्र काका सरस ठरले. पाटील यांच्या बरोबरीने निवडून आलेले रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर आणि प्रा. वर्षा भालेराव यांनी व्यक्तिगत पातळीवर प्रभाव निर्माण केला असला तरी आता प्रभागरचनेत ते पाटील यांच्या बरोबर राहण्याची शक्यता कमीच आहे.
या भागात गेल्या तीस वर्षांत ‘जिकडे पाटील तिकडे मतदार’ असे समीकरण त्यांनी तयार केले आहे. मात्र, आता एकसदस्यीय प्रभागातून बरेच राजकारण बदलणार आहे.
करण गायकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लढण्याची तयारी केली असली तरी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे अन्यही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचेदेखील या ठिकाणी अस्तित्व आहे. काँग्रेस त्या तुलनेत क्षीण आहे. दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये राहणार असल्याचे तूर्तास संकेत दिले असून, त्यांचे पुत्र अमेाल हेदेखील तयारीत आहेत. प्रेम पाटील लढणार; मात्र त्यांचा पक्ष निश्चित नाही. अशा स्थितीत पाटील बंधूंच्या गडाला कोण आव्हान देणार हेच यंदा लक्षणीय ठरणार आहे.
इन्फो..
प्रमुख समस्या
- स्व. वसंतराव कानेटकर उद्यानाकडे सपशेल दुर्लक्ष
- राेगराईने ग्रासले, सध्या डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण याच प्रभागात
- साफसफाई, धूरफवारणीचा अभाव.
- दुभाजकाच्या रेंगाळलेल्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
- प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा.
कोट
अजूनही रस्ते, लाईट, पाणी यांसारख्या सुविधांसाठी नगरसेवकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियामुळे प्रभागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. लोकप्रतिनिधी कुठे आणि काय काम करीत आहेत. नगरसेवक हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहेत. साडेपाच कोटी रुपये खर्च झालेल्या कानिटकर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे.
- प्रेम दशरथ पाटील, पराभूत उमेदवार.
इन्फो..
इच्छुक उमेदवार :- भाजप - दिनकर पाटील, हेमलता कांडेकर, अमोल पाटील, रवींद्र धिवरे, दिनकर कांडेकर.
शिवसेना - सविता गायकर, प्रमोद जाधव, साहेबराव जाधव.
राष्ट्रवादी - कल्पेश कांडेकर, सदाशिव माळी, श्रीराम मंडळ, महेश आहेर.
इतर- प्रेम दशरथ पाटील
-------
बातमीत दिनकर पाटील- प्रेम पाटील यांचे छायाचित्र वापरावे.