नाशिक : दोन्ही नेत्यांचा दौरा साधारण एकाच तारखांना आल्यापासून ज्याची शक्यता वर्तवली जात होती, तो क्षण रविवारी सकाळी उजाडला. एकाच शासकीय विश्रामगृहावर उतरलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेटीचा ‘राज योग’ जुळून आला.
मुंबईला परतण्यापूर्वी विश्रामगृहाबाहेर उभे असलेल्या ठाकरे आणि रविवार सकाळच्या नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर पडणाऱ्या पाटील यांची काही क्षणांसाठीच भेट झाली. राज्यात विविध महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शासनाच्या विरोधातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपबरोबर मनसेची युती होण्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. त्यात रविवारी सकाळी ठाकरे आणि पाटील यांच्या भेटीचा योग जुळून आल्याने तर त्या चर्चेला बहरच आला. नजीकच्या काळात मुंबई, नाशिक, पुणे आणि ठाणे महापालिकेत अशा प्रकारची समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही उतरणार म्हटल्यानंतर नाशिकमध्येच युतीची पायाभरणी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्व राज्याला हवे आहे, असे सांगताना त्यांचे कौतुक केले होते.
इन्फो
‘योग’ की ‘योगायोग’
योग असेल तर राज यांची भेट होईल असे सांगणाऱ्या पाटील यांनी सकाळी विश्रामगृहावर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे हा योग जुळून आलेला होता की कुणाकडून जुळवून आणला गेेलेला ‘योगायोग’ होता, ते भविष्यातच कळू शकणार आहे.