नाशिक : पितरांच्या स्मरणार्थ पाळल्या जाणाऱ्या पितृ पंधरवड्याला प्रारंभ झाला असून, येत्या २३ सप्टेंबरपर्यंत (सर्वपित्री अमावास्या) घरोघरी श्राद्धविधी होणार आहेत. दरम्यान, पितृपक्षात कोणतीही खरेदी, व्यवहार वा शुभकार्य अशुभ मानले जात असल्याने पुढील पंधरवड्यात बाजारपेठेतील उलाढाल मंदावण्याची चिन्हे आहेत. हिंदू धर्मात पितृपक्ष हा पितरांच्या स्मरणार्थ पाळला जातो. घरातील व्यक्ती ज्या तिथीला दिवंगत झालेल्या असतात, त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध घातले जाते. तर्पणविधी, भाताचे पिंडदान केले जाते. दि. ८ सप्टेंबर (भाद्रपद कृष्ण प्रतिपदा) रोजी या पंधरवड्याला प्रारंभ झाला. भरणी श्राद्ध (दि. १३), अविधवा नवमी (दि. १७), शस्त्रादीहत् पितृश्राद्ध (दि. २२) व सर्वपित्री अमावास्या (दि. २३) हे या पंधरवड्यातील महत्त्वाचे दिवस आहेत. मृत्यूची तिथी माहीत नसल्यास वा त्या तिथीला श्राद्ध करता येऊ न शकल्यास सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करावे, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. पितृपंधरवड्यामुळे येत्या दि. २३ पर्यंत बाजारपेठेतील उलाढाल मंदावणार आहे. पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी पितृपक्षात त्यांना प्रतीकात्मक तर्पण, भोजन दिले जाते. या काळात साखरपुडा, विवाहासाठी मुहूर्त नसतात. वस्तूंच्या खरेदीला निर्बंध नाहीत; मात्र श्राद्धकर्माचा काळ अशुभ मानला जात असल्याने खरेदी न करण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. याला शास्त्रीय आधार नाही, असे काही अभ्यासकांनी सांगितले.
पितृपक्षाला प्रारंभ; उलाढाल मंदावणार
By admin | Published: September 10, 2014 10:47 PM