नाशिक, दि. 31- नाशिक शहरातील पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून २९६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढलेली असून नदीवरील सांडव्यावरील पूल पाण्यात बुडालेला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास चार तरुणांनी हा पूल पार करण्याचं धाडस केलं. पुराची पातळी वाढत असतानाही हे तरूण पूल पार करण्याचं जीवघेणं धाडस करीत होते. त्यांना अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते पाण्यात उतरले. त्यांना पाहण्यासाठी गर्दीही झाली होती. सुदैवाने कोणतीही घटना घडली नसली तरी पुराच्या पाण्यातून पूल पार करतांना स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
नदीकाठावरील नारोशंकर पटांगण येथेही काही अतिउत्साही महिला आणि लहान मुले पुराच्या पाण्यात डुबण्याचा आनंद घेत आहेत. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात महिला आणि लहान मुले डुंबण्याचा अतिउत्साहीपणा दाखवित आहेत.