नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू झालेल्या लढाईत अखेरीस भाजपची सरशी झाली आहे. सभापतीपदी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज असल्याने यांसदर्भातील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषीत करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. ३) दिले आहेत. त्यामुळे गिते यांच्या निवडीची केवळ औपचारीकताच आता बाकी आहे.
सुमारे महिनाभरापासून हा घोळ सुरू होता. न्यायलयाच्या प्रकरण प्रविष्ट होण्याच्या आतच विभागीय आयुक्तांनी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घोषीत केली होती. त्यामुळे न्यायालयाने एकदा सुरू झालेली प्रक्रिया थांबविता येत नसल्याने नव्याने प्रक्रिया राबविण्याचे मात्र, निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने घेण्याचे आदेश दिले होते. ६ मार्च रोजी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे गणेश गिते यांनी एकमेव अर्ज दाखल होता. तर शिवसेनेच्या चार सदस्यांनी निवडणूकीवर बहिष्कार घातला होता. त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी थेट न्यायालयाला कळविला होता. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शासनाला सदस्य निवडीबाबत पाठविलेल्या अहवालात शिवसेनेला अनुकूल भूमिका असल्याने त्याचा आधार घेत त्यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. तर दोन दिवसांपूर्वी गणेश गिते यांनी उच्च न्यायालयात अर्ज करून आपण एकमेव उमेदवार असल्याने निवड घोषीत करण्याची मागणी केली होती.
शुक्रवारी (दि.३) उच्च न्यायलयात ए. एस. सैय्यद यांच्या समोर याबाबत सुनावणी झाली. त्यात गिते यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड घोषीत करावी अशी मागणी गीते यांची बाजु मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात यांनी मांडल्यानंतर न्यायामुर्तीनी निवडणूक निर्णय अधिकाºयांनी पाठविलेला लिफाफा तपासून निकाल घोषती करण्याचे आदेश दिले.