सप्तशृंगगड : नांदुरी ते श्रीक्षेत्र सप्तशृंगगड या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांची गैरसोय होत आहे. धोंड्या- कोंड्याच्या विहिरीजवळ गावात प्रवेश करताना भाविकांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अंदाजे एक फुटाचे खड्डे झाले असल्यामूळे व परतीचा प्रवास करताना अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परतीच्या रस्त्याला उतार असल्यामुळे वाहने चालविताना अवघड परिस्थिती निर्माण होत आहे. रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. मोटारसायकल चालकांना त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे आठ दिवसांपूर्वीच पती व पत्नी मोटारसायकलवरून प्रवास करत असताना या खड्ड्यात पडून त्यांचा अपघात झाला होता. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अनेक वाहनचालक दुखापतग्रस्त होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वारंवार गडावर येत असतात. याच रस्त्यावरून त्यांचे येणे-जाणे असते. परंतु ते फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यत केला आहे. या रस्त्याकडे बांधकाम विभागाने कायमच दुर्लक्ष केले आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अंतर्गत गटारीच्या कामामूळे सप्तशृंगगडावरील रस्त्याची पूर्णता वाट लागली आहे मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्यातून गज बाहेर आले असल्यामूळे भाविकांना पायाला लागणे व जखमी होणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे.या रस्त्यावरील खड्ड्यांची डोकेदुखी हा नेहमीचाच त्रास आहे. पावसाळ्यात हा त्रास जासत्च सहन करावा लागत आहे. या ठिकाणी सीमेंट पाइप टाकणे गरजेचे आहे. मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने व पाणी साचल्याने अपघात होत आहे. प्रत्यक्ष भेटूनही या रस्त्याच्या कामाबाबत विनंती केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. हे खड्डे अजून किती अपघात करणार याची वाट बघत आहे.- संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ता, सप्तशृंगगड
सप्तशृंगगडावरील रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:24 AM