---
मखमलाबादमधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
नाशिक : मखमलाबादरोडवरील एक १४ वर्षीय मुलीला अज्ञात अपहरणकर्त्याने काही तरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार म्हसरुळ पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दिली आहे. पालकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून आली नाही, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
---
पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘पीआरओ’ला धक्काबुक्की
नाशिक : आडगाव परिसरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमध्ये उपअधीक्षक कक्षासमोरील जागेत संशयित निवृत्ती आवाजी गालट (३५,रा.बोरपाडा, पेठ) ही व्यक्ती संशयास्पदरित्या वावर करत होती. यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक अंबादास सूर्यवंशी (३५) यांनी त्यास हटकले. ‘आपल्याला कोणाला भेटायचे आहे,’ असे विचारले असता त्याचा राग मनात धरुन संशयित निवृत्ती याने सूर्यवंशी यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या अंगातील शर्ट ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आडगाव पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित गालट यास पोलिसांनी अटक केली आहे.
---
कार अपघातात पती-पत्नी जखमी
नाशिक : सिटी सेंटरकडून एबीबी सर्कलमार्गे महात्मानगरकडे फिर्यादी नितीन प्रदीप सोनी हे त्यांच्या पत्नीसमवेत कारमधून (एम.एच.१५ जीएक्स १४५५) शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मार्गस्थ होत होते. यावेळी सातपूरकडून त्र्यंबकरोडने भरधाव आलेल्या मारुती स्विफ्ट डिझायर कारच्या (एम एच३१ डीसी ५८४७) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले तर सोनी दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. सोनी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कारचालक संदीप दिनेश पाटील (३२,रा.मंदाने, ता. शहादा) यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.